top of page

समाज आणि तरूणाईपासून पूर्णत : तुटलेल्या साहित्य संस्था आणि संमेलने

Writer's picture: Prof. Kshitij PatukaleProf. Kshitij Patukale

Updated: Apr 29, 2020


साहित्य निर्मिती आणि साहित्याचा प्रचार प्रसार यांचा समाज मानसावर एक निश्चित असा पगडा असतो. कथा, कादंबरी, काव्य, ललितलेखन, अनुवाद, चरित्र लेखन, वैचारिक साहित्य, उपयुक्त आणि माहितीपर साहित्य इ. अनेक ढंगाने साहित्य निर्मिती होत असते. साहित्याचा प्रभाव समाजावर पडतो. बृहत समाज मानस घडत असताना त्यावर साहित्याच्या विविध प्रकारांमधून प्रसारीत केल्या गेलेल्या विचारांचा एक अदृष्य पण खोलवर ठसा उमटलेला आढळतो. एका पिढीचे वैचारीक, भावनिक आणि मानसिक पोषण काही साहित्यिकांनी केल्याचे आढळते. मराठी साहित्यविश्वाचा विचार करता केशवसुत, राम गणेश गडकरी, प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे इ. अनेक साहित्यिकांनी केलेल्या लिखाणामुळे विशिष्ठ कालखंडातील समाजाचे वैचारिक भरणपोषण झाले, असे आपल्याला दिसून येते. मात्र या साहित्य क्षेत्रातील व्यवहार आणि घडामोडी यांचे सद्यस्थितीत अवलोकन केले असता काही विशिष्ठ व्यक्ती आणि विचारधारा यांचेच निसंदिग्ध प्राबल्य तेथे दिसून येते. समाजाला सतत गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये ठेवणे, त्यांना प्राचिन सकारात्मक इतिहास आणि आदर्श यापासून दूर ठेवून भ्रामक कल्पनांचा गदारोळ तयार करणे, असेच प्रकार दिसून येतात. लोकशाहीचा डंका वाजवूनही वर्षानुवर्षे साहित्य संस्था आपल्याच ताब्यात ठेवायचे व्रत त्यांनी घेतलेले दिसून येते. फक्त आपलेच नातेवाईक आणि जवळचे लोक यांनाच सभासद करून घेतलेले आहे. वर्षानुवर्षे तेच तेच अध्यक्ष आणि तेच तेच पदाधिकारी पहायची आणि त्यांच्या लीला सहन करायची पाळी साहित्य रसिकांवर आली आहे. सध्याच्या साहित्य विश्वातील वास्तवाचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे या साहित्य संस्थाचे समाजापासूनचे आणि तरूणाईबरोबरचे नाते पूर्णतः तुटले आहे. साहित्य संस्थातील पदाधिका-यांचे बुरसटलेले विचार आणि एककल्ली वर्तन यामुळे त्यांची समाजापासून नाळ तुटली आहे. अत्यंत भव्य दिव्य साहित्य संमेलने आणि साहित्यिक उपक्रम पाहून सर्व सामान्य जनता अवाक होते. मात्र तेथे नेमके काय चालते याची सर्वसामान्यांना कोणतीही माहिती नसते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कसे निवडून येतात आणि कोणत्या प्रकारची लोकशाही व्यवस्था तेथे राबवली जाते याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. फ़क्त वैयक्तिक स्वार्थ आणि दांभिकता यांनी एकंदरीतच साहित्य विश्वाला अवकळा प्राप्त झाली आहे. मिंधे, लाचार, मानधनासाठी वखवखलेले पदाधिकारी पाहून हसावे का रडावे ते कळत नाही. प्रतिभा, सृजनशिलता, धैर्य आणि साहस हरविलेले हे लोक काय आजच्या पिढीला दिशा देणार या विचारांनी मन व्याकुळ होते. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीद्वारे भारतीय क्रिकेट विश्वाच्या शुद्धीकरणाची आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्याची खेळी सुरू केली आहे, तशीच एखादी समिती नेमून साहित्य क्षेत्राचे तातडीने शुद्धीकरण करायची गरज आहे.

आपल्या महाराष्ट्रापुरता मराठी भाषेचा विचार केला तर अतिशय दारुण चित्र समोर येते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून सरकारमान्य अशा ४ प्रमुख साहित्य संस्था आहेत.

१) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे - सभासद संख्या अंदाजे - १३०००

२) विदर्भ साहित्य परिषद नागपूर - सभासद संख्या अंदाजे - २०००

३) मुंबई मराठी साहित्य संस्था मुंबई - सभासद संख्या अंदाजे - १०००

४) मराठवाडा साहित्य महामंडळ औरंगाबाद - सभासद संख्या अंदाजे – ३०००

तसेच देशातील इतर राज्यात बृहन महाराष्ट्र साहित्य मंडळाच्या स्थानिक शाखा आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असून भारतातील इतर राज्यात राहणा-या मराठी भाषिकांची संख्या २ कोटीच्या आसपास आहे. परदेशांमध्ये राहणारे एकूण मराठी भाषिक ५० लाखांपर्यंत आहेत. यातील ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे या एकूण १४.५० कोटी पैकी किमान १० कोटी लोक आहेत. १० कोटी मराठी भाषिकांपैकी साहित्य संस्थातील सभासद संख्या २०,००० देखिल नाही. त्यातील अनेक सभासद मयत आहेत आणि अनेक सभासद बोगसही आहेत असे सांगितले जाते. याचा अर्थ मराठी भाषकांपैकी ०.०२०% लोकही साहित्य वर्तुळामध्ये सामिल नाहीत. ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रगत आणि इतर विकसनसील देशांमध्ये किमान २ ते ३ % लोक साहित्य संस्थामध्ये कार्यरत आहेत आणि विविध उपक्रमांव्दारे जोडले गेले आहेत. या न्यायाने किमान २० ते ३० लाख व्यक्तींनी साहित्य संस्थांचे सभासदत्व घेणे गरजेचे आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील साहित्य विश्वातील संस्थाचा कारभार आणि लोकसंख्या यातील नाते केविलवाणे आहे.

मराठी साहित्य विश्वामध्ये वाचन संस्कृती आणि साहित्यिक याबाबत अनेक ठिकाणी अनेक वेळा चर्चा आणि लिखाण झालेले आहे. यामध्ये साहित्यिक, प्रकाशक, वाचनालये आणि वाचक असा एक चौकोन तयार झालेला आहे. याच्याशी संलग्न अनेक इतर घटकही आहेत. उदा. विविध साहित्य परिषदा, संस्था, वाचक संस्था, किरकोळ पुस्तक विक्रेते, मीडिया, सरकारी संस्था, इ. या सर्वांमध्ये प्रत्यक्ष वाचक आणि साहित्यिक यांची एकत्र संवाद-व्यवस्था नाही. थोड्या फार प्रमाणात काही साहित्यिक काही वाचक समूहांबरोबर संवाद साधताना दिसतात. बहुतांश साहित्यिक हे हौस, प्रतिष्ठेचे साधन आणि पुरवणी आर्थिक मिळकतीसाठी साहित्य लिहितात. त्यांच्या पोटापाण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय असे मुख्य साधन असते. आर्थिक स्थैर्यानंतर ते लिखाण करतात. पूर्णत: व्यावसायिक लेखक मराठी साहित्यविश्वात अपवादानेच आढळतील. याचबरोबर साहित्यिक आणि प्रकाशक हे नातेही अतिशय गुंतागुंतीचे असते. आपण लिहिलेले काही तरी साहित्य प्रकाशित व्हावे अशी लेखकाला ओढ असते. प्रकाशकाच्या दृष्टीने ती एक जोखीम असते. त्यामुळे त्यांच्यामधील नाते प्रेम विवाहासारखे सुरुवातीला हवेहवेसे आणि नंतर दरी वाढत जाणारे, घटस्फोटाकडे जाणारे असेच अनेकदा असते. याचबरोबर कॉपीराईट कायदा, लेखक-प्रकाशक करार यां बाबत फारशी जागरूकता आढळत नाही. अनेकदा एकमेकांबद्दल अस्वस्थता आणि असुरक्षितता वाटत राहते. साहित्य क्षेत्रातील संस्था, तेथील पदाधिकारी, सरकारी संस्था यांचा दृष्टीकोन अतिशय विचित्र आणि अतार्किक असल्याचे अनेकदा जाणवते. त्याचवेळी किरकोळ पुस्तक विक्रेते, वितरक, वाचनालये, संस्था इ. घटकांचे योगदान पूर्णत: अर्थकेंद्रित ( बाकी सारे गेले उडत... मला किती पैसे मिळतील ते आधी सांगा अशा प्रकारचे ) असल्याचे आढळते. विविध साहित्य संमेलने, मेळावे, पुस्तक प्रदर्शन यांचे स्वरूप हे उत्सवी स्वरूपाचे असते. सरकारी अनास्था आणि राजकारण्यांचा दृष्टीकोन हा एक वेगळाच चिंतनाचा विषय आहे.

या दरम्यान गेल्या काही वर्षात संपूर्ण जगामध्ये सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडविले आहेत. साहित्य-पुस्तक-प्रकाशन हे क्षेत्रही याला अपवाद नाही. तंत्रज्ञानामुळे साहित्यिक आणि वाचक यांना जवळ आणले आहे. पुस्तक लिहिणे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवणे यातील वितरक यंत्रणा सर्वांगाने बदलत चालल्या आहेत. साहित्यिक आणि वाचक यांना एकमेकांबरोबर मुक्त संवाद साधता येतो आहे. याचबरोबर फक्त लेखन झाले की माझे काम संपले असे म्हणणा-या लेखकाला तंत्रज्ञानामुळे अधिक वाव ( Scope ) निर्माण झाला आहे. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, व्हॉटस अप, यु ट्युब, ई बुक, प्रिंट ऑन डिमांड, डिजिटल प्रिंटिंग इ. अनेक आधुनिक तांत्रिक अविष्कारांमुळे साहित्य आणि पुस्तकनिर्मिती हे क्षेत्र पूर्णत: ढवळून निघत आहे. भविष्यात प्रकाशन व्यवसाय आणि पुस्तक विक्री व्यवसायाचे चित्र संपूर्णत: बदलून ई बुक आणि तंत्राधिष्ठित पुस्तकनिर्मिती आणि वितरण अशी व्यवस्था उदयाला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम यांनी तंत्राधिष्ठित डायरेक्ट वितरण व्यवस्था निर्माण केली आहे. डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे ऑनलाईन पुस्तक विक्रीला सुगिचे दिवस आले आहेत. “ तुम्हाला पाहिजे तेवढे कमिशन घ्या... जमतील तेव्हा पैसे द्या... पण माझी पुस्तके विक्रीला ठेवा हो..” अशी दुकानदारांना अजिजी करायचा आणि त्यांची अरेरावी सहन करायचा काळ आता संपला आहे. शिवाय एखादा लेखक आता अगदी ५०० प्रतींची आणि प्रिंट ऑन डिमांडमुळे शंभर ते दोनशे पुस्तकांचीही आवृत्ती काढू शकतो.

अशावेळी अजूनही साहित्य क्षेत्रातील घडामोडी आणि एकंदरीत बाह्य चित्र हे परंपरागत संस्था, साहित्यिक, नोकरशाही, वाचनालये, विक्रेते यांच्या जुनाट साचेबंद वर्तणुकीतच घुटमळताना दिसत आहे. जणुकाही बाहेरच्या जगात काय चालले आहे याचा त्यांना थांगपत्ताही नाही, होणारे बदल त्यांना दिसतच नाहीत किंवा कोणत्याही बदलांची आपण पर्वा करायची गरज नाही अशा थाटात हा वर्ग वावरत आहे. वाचनालयांना पुस्तकाच्या छापिल किंमतीवर ८५ % पर्यंत सवलतींचा वर्षाव करून अत्यंत सुमार दर्जाचे साहित्य सर्वसामान्य वाचकांच्या आणि तरूणाईच्या माथी मारत आहोत याची कोणीही फिकिर करीत नाही असे सध्याचे चित्र आहे. खरेतर सरस्वतीच्या दरबारात हे फार मोठे गंभिर साहित्यिक पापकर्म आणि अक्षम्य गुन्हा आहे हे सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे. पुढिल पिढ्यांना त्यांच्या हक्काचा वारसा न देता आपण तरूणाईला आणि युवा पिढीला नासवतोय याची लाज संबंधितांनी बाळगणे गरजेचे आहे. मात्र माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंहराव यांच्या पुत्राच्या युरिया घोटाळ्याप्रमाणे साहित्य निर्मिती आणि वितरण व्यवस्थेमध्ये घोटाळ्याचे आरोप असणार्यांची चलती असताना साहित्य विश्वामध्ये भ्रष्टाचार या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल असे चित्र आहे.

याचवेळी साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतानाचे चित्र दिसत आहे. आजच्या वाचकांची प्रगल्भता वाढत आहे. साहित्यक्षेत्राचा आवाका आणि क्षितिजे यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. तेव्हा साहित्यिक आणि वाचकांनीच सजग होणे ही काळाची गरज आहे. आजच्या काळात साहित्यिक आणि वाचक यांनी एकमेकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकत्र जोडून घेतले पाहिजे. साहित्यिक म्हणजे फक्त प्रसिद्ध आणि यशस्वी साहित्यिक अशी व्याख्या न करता जो कोणी लिहू शकतो, ज्याला आपल्या भावना लिहून व्यक्त करता येतात. म्हणजेच जो " लिहिता " झाला आहे, तो साहित्यिक असे मानले पाहिजे. यामध्ये लेखक, लघुनिबंधक, नाटककार, एकांकिकाकार, कादबंरीकार, कवी, चारोळ्याकार, प्रहसनकार, विडबंनकार इतकेच काय तर वर्तमानपत्रातील पत्रलेखक, शाळा-कॉलेजमधील नियतकालिकांमध्ये लिहिणा-या विद्यार्थ्यांचा, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे. साहित्यामुळे व्यक्तीचा, समाजाचा आणि राष्ट्राचा वैचारिक विकास होतो. त्याच्या सामाजिक जाणिवा आणि आकलनक्षमता यांची वाढ होते. जीवन कसे जगावे, कशा पध्दतीने जगावे याबद्दलचा विचार विकसित होतो. एकंदरीत समाज प्रगल्भ होतो. साहित्य आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये सर्वांना मुक्तपणे सहभागी होण्याची आणि त्याच्याशी जोडून घेण्याची फ़ार मोठी गरज आता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक व्यक्तींनी साहित्यसंस्थाचे सभासद होणे गरजेचे आहे. विशेषतः तरुणांनी आणि ५० पेक्षा कमी वयोगटातील स्त्री पुरुष नागरिकांनी साहित्य संस्थांचे आजिव सभासदत्व घ्यावे. विद्यार्थी, युवक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, समाजसेवक, उद्योजक, नोकरदार, स्त्री-पुरूष इ. समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींनी साहित्य संस्थांचे सभासद व्हावे. विशेषत: महाविद्यालयिन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी साहित्य संस्थांचे सभासद होण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात. येत्या तीन वर्षामध्ये किमान १० ते २० लाख नविन मराठी बांधवांनी साहित्य संस्थांचे सभासदत्व घ्यावे. साहित्य संस्थांचे सभासद होण्यासाठी लेखक, कवी किंवा साहित्यिक असण्याची गरज नाही. कोणतीही १८ वर्षे पूर्ण झालेली आणि आधार कार्ड असलेली व्यक्ती कोणत्याही साहित्य संस्थेचे सभासद होवू शकते. एकाच कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांनी त्या त्या विभागातील मुंबईमध्ये मुंबई मराठी साहित्य संस्था, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भामध्ये विदर्भ साहित्य परिषद, मराठवाड्यामध्ये मराठवाडा साहित्य परिषद यांचे सभासदत्व घ्यावे आणि साहित्य विषयक विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी व्हावे. त्याशिवाय परदेशातील मराठी बांधवांनीही साहित्य संस्थांचे सभासदत्व घ्यावे. परदेशामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून नविन मराठी साहित्य संस्था निर्माण कराव्यात आणि त्या भारतातील साहित्य संस्थांबरोबर संलग्न कराव्यात. जास्तित जास्त मराठी बांधवांनी आणि युवा पिढीने त्यामध्ये सहभागी व्हावे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी तंत्रज्ञान आपलेसे करण्यात पुढाकार घेतला असून स्वत:ची अद्ययावत वेबसाईट तयार केली आहे. स्वत:चा सोशल मिडिया तयार केला असून विविध अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. मसापच्या सभासदत्वाचा अर्ज www.masapapune.org या वेबसाईटवर उपलब्ध केला आहे. साहित्य आणि संकृती संवर्धनासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील साहित्य विषयक अनेक उपक्रम ( उदा. दुबई लिटररी फेस्टीवल, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथिल साहित्य महोत्सव, इ. ) सुरु असतात. अशा सर्व प्रकारच्या उपक्रमांची त्यामुळे ओळख होईल आणि त्यामध्ये सहभागी होता येईल. त्यामुळे साहित्य आणि समाज यातील दरी कमी होईल. साहित्य क्षेत्रामध्ये विधायक सुधारणा घडविता येतील आणि एकदंरीत समाजमानसाला एक सकारात्मक दिशा देता येईल.

३१८ views० comments

Recent Posts

See All

थोडे गवसले... बरेचसे हरवले ! ९० वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ डोंबिवली

मराठी साहित्य विश्वातील दरवर्षी साजरा होणारा एक अनोखा सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. भारतामध्ये फक्त मराठी भाषेमध्ये असा...

Comments


bottom of page